CGST Commissionerate, Raigad arrests 29 year old involved in fake GST Input Tax Credit racket
रायगडच्या सीजीएसटी आयुक्तालयाकडून बेकायदेशीर जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड- एकाला अटक
मुंबई : मुंबई प्रदेशाच्या रायगड सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड केला. या प्रकरणी एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीने 15 पेक्षा जास्त बनावट कंपन्या स्थापन करून 180 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
या प्रकरणातल्या आरोपीला 05 मार्च 2022 रोजी सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 69 अंतर्गत, केलेल्या गुन्ह्यासाठी कलम 132 अंतर्गत अटक करण्यात येऊन पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सीजीएसटी आयुक्तालयाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेली ही तिसरी व्यक्ती आहे. याआधी कळंबोली येथे मेसर्स अशोक मेटल स्क्रॅप आणि मेसर्स झैद एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांच्या मालकांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही कंपन्यांनी मेटल स्क्रॅपचा व्यापार करताना 25 कोटी रूपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा केला आणि 135 कोटी रूपयांच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या.
वर उल्लेख केलेल्या कारवाईशिवाय, याच प्रकारच्या आधी घडलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण तसेच डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करून विभागाचे अधिकारी नवी मुंबईच्या तळोजा भागात नव्याने सुरु होत असलेल्या आणि येथून व्यवहार करत असलेल्या अशा अनेक बनावट कंपन्यांवर नजर ठेवून आहेत.
येत्या काळात सीजीएसटी विभाग बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.