CGST Commissionerate, Raigad busts fake GST Input Tax Credit racket
रायगडच्या सीजीएसटी आयुक्तालयाने बेकायदेशीर जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस आणला
मुंबई : मुंबई प्रदेशाच्या रायगड सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आज बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी 70 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या 13 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवणाऱ्या कळंबोली स्थित मे. झैद एन्टरप्रायझेस या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.
मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर रायगडच्या सीजीएसटी आयुक्तालयातील कर चुकवेगिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या चौकशी अंती असे दिसून आले की झैद एन्टरप्रायझेस या कंपनीने अस्तित्वात नसलेल्या 10 कंपन्यांच्या नावाने खोट्या पावत्यांचा वापर करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतला आहे किंवा तो इतरांना दिला आहे. या कंपनीचा मालक कंपनीचे व्यवहार जीएसटी पोर्टलवर नोंदविलेल्या पत्त्यावरून न करता सतत बदलत्या ठिकाणांहून करत होता. त्याचा माग काढण्यात आला आणि 15 किलोमीटर पाठलाग करून नवी मुंबईतील एका पेट्रोल पंपाजवळ त्याला पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
आरोपीला 04 मार्च 2022 रोजी सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 69 अंतर्गत, केलेल्या गुन्ह्यासाठी कलम 132 अंतर्गत अटक करण्यात येऊन पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
वर उल्लेख केलेल्या कारवाईशिवाय, याच प्रकारच्या आधी घडलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण तसेच डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करून विभागाचे अधिकारी नवी मुंबईच्या तळोजा भागात नव्याने सुरु होत असलेल्या आणि येथून व्यवहार करत असलेल्या अशा अनेक बनावट कंपन्यांवर नजर ठेवून आहेत.
अशा कंपन्या बनावट अथवा चोरीला गेलेल्या ओळखपत्रांच्या आधारावर जीएसटी नोंदणी करून घेतात अथवा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करणे, मिळवणे, वापरणे आणि इतरांना हस्तांतरित करणे यासाठी या ओळखींचा वापर करतात.
रायगड सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे 700 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 405 कोटी रुपये वसूल केले, तसेच या संदर्भात 9 व्यक्तींना अटक देखील केली आहे.