Chhatrapati Shivaji Maharaj is a king with all qualities
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशीष शेलार, आमदार पराग आळवणी, संत गाडगे महाराज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश उर्फ भाऊ चौधरी उपस्थित होते.
मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून महाराजांसमोर नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रभू श्री रामाप्रमाणेच समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले. सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली. गुलामगिरीच्या विरुद्ध लढा उभारला. माँ जिजाऊ साहेबांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. माता -भगिनींचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती, राजनीती, परराष्ट्रनिती याचा अभ्यास जगभरात केला जातो. त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे काम कसे करावे हा पाठ शिकवला, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला सन्मान आणि महिला सुरक्षा या विषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करत आहेत. २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे. देशाची पुढील हजार वर्षांची वाटचाल कशी असावी याचा वस्तुपाठच महाराजांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान, तेज यातूनच नव भारत निर्मितीचे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे”