We will make women more empowered through ‘Chief Minister Mahila Sakthikaran Abhiyan’
‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना’तून महिलांना अधिक सक्षम बनवू – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
नागपूर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना अधिक सक्षम बनवू. हे अभियान महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने कालबध्द नियोजन करावे व त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासंदर्भात विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. या बैठकीस महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले की, विविध विभागामार्फत महिलांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करावी. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून या योजनांचा लाभ लाभार्थी महिलांना मिळवून द्यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महिला आर्थिक विकास मंडळाने अधिक गतीने काम करावे. अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रशिक्षणाचे नियोजन करून संबंधितांना प्रशिक्षण द्यावे. अभियानाच्या प्रचार प्रसारासाठीही विभागाने नियोजन करावे.
राज्यातील 1 कोटी महिलांना शक्ती गटाच्या/महिला बचत गटाच्या प्रवाहात जोडणे, जिल्हा व तालुकास्तरावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अधिकारी, प्रशिक्षण संस्थांचा सहभाग या अभियानात वाढविणे बाबतही महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे यांनी सूचना दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना’तून महिलांना अधिक सक्षम बनवू”