Delegations of various countries met Chief Minister Shinde at Davos
दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट
भेटीदरम्यान महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत चर्चा
मुंबई : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या दोघांसमवेत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालीन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला.
शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी तथा उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशी देखील चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.
बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह या बहुराष्ट्रीय पेय आणि मद्यनिर्मिती कंपनीसोबत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या ६०० कोटी रुपयांच्या ($ ७३ दशलक्ष) सामंजस्य करारावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
गुंतवणूक संधींबद्दल ओमानचे उद्योग मंत्री एच.ई. कैर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या ‘व्हिजन २०४०’ साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दावोसमधील सीआयआयच्या इंडिया बिझिनेस हबला भेट दिली. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारतीय तिरंगा डौलाने फडकत असून ते अभिमानास्पद असल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com