Chief Minister Uddhav Thackeray and Telangana Chief Minister K. Meeting between Chandrasekhar Rao in Mumbai today.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलगंणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यात आज मुंबईत बैठक.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात आज मुंबईत बैठक झाली. देशात परिवर्तनाची गरज असून अवैध कामांविरोधात लोकशाहीच्या मार्गानं लढा देण्याच्या मुद्द्यावर यावेळी सहमती झाल्याचं राव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
देशाची प्रगती, आर्थिक सुधारणा, विकासाची गती वाढवणं आणि धोरण बदल यासारख्या अनेक विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली आणि बहुतांश विषयावर सहमती झाल्याचं ते म्हणाले. देशातल्या केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर सुरू आहे. वातावरण खराब करण्याचे प्रयत्न होत आहे. या सर्वांशी लोकशाही मार्गाने लढा देणार असून देशातल्या अन्य नेत्यांशीही यामुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
देशातल्या मुलभूत प्रश्नांकडे सध्या दुर्लक्ष होतंय. त्यामुळं देशाच्या भविष्याचा एकत्र विचार करण्यासाठी आणि नव्या विचारांची सुरुवात म्हणून आजची बैठक होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशातलं सुडाचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलं असून हे आमचं हिंदुत्व नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याभेटी दरम्यान उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासह तेलगंणाचं शिष्टमंडळ उपस्थित होतं.