A voter should exercise his right to vote without succumbing to any temptation
कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदाराने मतदानाचा अधिकार बजवावा
मतदानाचा पवित्र अधिकार बजाविण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन
पुणे : चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली असून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र अधिकार बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघातील सर्व मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठ्या वाटण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गटस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या ५१० बीएलओ तसेच ८४ नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. मतदान केंद्रांबाबत मतदारांना माहिती दिली जात आहे.
मतदारांमध्ये जनजागृती होऊन तो निवडणूक प्रक्रीयेत सहभागी व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक यांचा मतदार जागृतीसाठी सहभाग घेण्यात येत आहे.
मागील मतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करून विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर केंद्रांवर दिव्यागांसाठी सुविधा उपलब्ध केली असून दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्याकरिता स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.
मतदारांनी निर्भयपणे मताधिकार बजवावा आणि आचारसंहिताभंगाच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी सी-व्हिजील अॅपवर तात्काळ तक्रार दाखल करावी, असे आवाहनही श्री. ढोले यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com