राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

Commencement of the budget session of the State Legislature

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभVidhan Bhavan, Mumbai

मुंबई  :  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रथेप्रमाणे अभिभाषणाला सुरुवात केली.

कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनानं अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. मुंबई शहर त्याबाबतीत अन्य शहरांसाठी पथदर्शक शहर ठरलं, असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले. कोरोना संकटकाळात राज्य सरकारनं समाजातल्या दुर्बल घटकांचं दु:ख कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले, असं ते म्हणाले.

आर्थिक चणचण असूनदेखील अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला तसंच औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याचवेळी, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला, असं राज्यपालांनी अभिभाषणात सांगितलं. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ आणि अन्नसुरक्षा देणाऱ्या योजनांवर राज्य सरकारनं विशेष भर दिला, असं ते म्हणाले. सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभं राहण्याचा सरकारचा निर्धार आहे, असं ते म्हणाले.

त्यांचं भाषण सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं अवघ्या दोन तीन मिनिटातच राज्यपालांनी भाषण आटोपतं घेतलं आणि ते निघून गेले. त्यानंतरही घोषणाबाजी चालूच होती. राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून केल्यानं सत्ताधारी सदस्य, राज्यपालांचा विधानभवनात प्रवेश झाल्यापासूनच आक्रमक झाले होते. ते सभागृहात येताच घोषणा चालू झाल्या.

विधानपरिषदेचं कामकाज सुरू होताच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या बाबतचा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न केला मात्र याला अनुमती नसल्याचं सांगत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दरेकर यांचं कोणतंही वक्तव्य नोंदीत घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं. तरीही दरेकर बोलत राहिले तर विरोधी पक्ष सदस्य मलिक यांच्याविरोधात घोषणा देत हौद्यात जमा झाले. याच गोंधळात सभापतींनी कार्यक्रम पत्रिकेवरील कार्यक्रम पूर्ण केला.

भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज आणि दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याची घोषणा सभापतींनी केली. विधानसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या गदारोळातच अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार२५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *