Appreciation of the outstanding contribution of the consumer electronics industry in India
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या उल्लेखनीय योगदानाची केली प्रशंसा
भारतीय परिसंस्थेला पाठबळ देण्याचे आणि स्थानिक उत्पादकांमध्ये सहकार्याला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करत दर्जाला प्राधान्य देण्याचे गोयल यांचे उद्योगांना आवाहन
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. ते काल नवी दिल्ली येथे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे उत्पादकांच्या संघटनेच्या 44 व्या वार्षिक संमेलनात बोलत होते. एकत्रित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्याचे महत्त्व त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले.
भारताची विकासाची वाटचाल कायम राखण्यासाठी संधींचा त्वरेने लाभ घेणे,आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क राखणे आणि स्पर्धात्मकतेचा अंगिकार करण्यावर पीयूष गोयल यांनी भर दिला. उच्च दर्जाच्या आणि स्पर्धात्मक दर असलेल्या उत्पादनांची ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. भारतीय परिसंस्थेला पाठबळ देण्याचे आणि स्थानिक उत्पादकांमध्ये सहकार्याला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करत गोयल यांनी दर्जाला प्राधान्य देण्याचे उद्योगांना आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना विकसित भारत सदिच्छादूत बनण्याचे आवाहन केले आहे,असे गोयल यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आणि मोठ्या अभिमानाने विकसित देश बनण्याच्या भारताच्या प्रवासाचा एक भाग बनण्याचे आवाहन त्यांनी केले.विकसित भारत हा भ्रष्टाचारमुक्त भारत असेल जिथे वसाहतवादी मानसिकतेला आपण हद्दपार केलेले असेल, असे ते म्हणाले. 140 कोटी भारतीयांद्वारे लोकांच्या सामर्थ्याने होणाऱ्या विकासाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन गोयल यांनी अधोरेखित केला.
लाखो भारतीयांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि उपासमारीचे उच्चाटन करण्यासाठी मोफत अन्नधान्याची तरतूद करण्यासह सरकारने सुरू केलेल्या विविध सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांना केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. सरकार महिलाप्रणीत विकासाच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे उज्ज्वल भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेष, दर्जा आणि शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्याचे हितधारकांना आवाहन करत गोयल यांनी भारताच्या विकासगाथेमध्ये ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. विकासाला चालना देण्यासाठी उद्योगाकडून होणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आणि त्याला आणखी पुढे नेण्यासाठी सरकारच्या पाठबळाचा पुनरुच्चार केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा”