Cooperation with Taiwan will be increased in the field of technology and industry
तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र व तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी तैवान एक्स्टर्नल डेव्हलपमेंट कौन्सिल (ताईत्रा) चे अध्यक्ष जेम्स हुआंग, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तैपाई इकॉनॉमिक अॅण्ड कल्चरल सेंटर, मुंबईचे महासंचालक होमर च्यांग आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा १५ टक्के वाटा आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल असून राज्यात १७ हजार नोंदणीकृत स्टार्टअप, तर देशातील १०० पैकी २५ युनिकॉर्न आहेत. ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील डाटा सेंटरची क्षमता सातत्याने वाढत आहे. परकीय थेट गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून २०२८ पर्यंत राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट आहे.
तैवान हा नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवरचा देश असल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी कौतुक केले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणुकदारांना येथे प्रोत्साहन दिले जात असून शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. तैवान हा उद्योग आणि व्यापार क्षेत्रात महाराष्ट्राबरोबर विश्वासू भागीदार बनू शकतो, असे सांगून तैवानच्या उद्योजकांचे त्यांनी राज्यात स्वागत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र आणि तैवानमध्ये जग बदलण्याची क्षमता असल्याचे सांगून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विकास घडवू या, असे आवाहन त्यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ९० कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. या कंपन्यांसोबत चर्चा झाली असून त्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली आहे. या अनुषंगाने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. भारतातील लघु आणि मध्यम उद्योजकांनी हे प्रदर्शन अवश्य पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ताईत्राचे अध्यक्ष जेम्स हुआंग यांनी तैवान विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करीत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हा गुंतवणूक क्षेत्रात विश्वासू भागीदार असल्याचे सांगून डिजिटल क्षेत्रात उज्ज्वल भविष्यासाठी भारतासोबत यापुढेही एकत्रितपणे काम करून नवीन युग निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रात आघाडीवरील राज्य आहे. येथे गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासनामार्फत प्रोत्साहन आणि संपूर्ण सहकार्य दिले जात असून त्यांना गुंतवणुकीचा पूर्ण परतावा मिळेल, याची शाश्वती असते. हायड्रोजन हे भविष्यातील सर्वाधिक वापरले जाणारे इंधन असून ग्रीन हायड्रोजन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती त्यांनी दिली. तैवानमधील उद्योजक अतिशय मेहनती आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारे असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. उद्योगांसाठी महाराष्ट्रातील वातावरण अतिशय पोषक असल्याचे सांगून त्यांनी गुंतवणुकदारांचे स्वागत केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार”