Distribution of State Film Awards in a grand ceremony.
दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान
वाय’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट
दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री
संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत
मुंबई : सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार नृत्य, कार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी ५७ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘वाय’ या चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. ‘बाबा’ चित्रपटातील भूमिकेसाठी दीपक डोब्रियाल यास उत्कृष्ट अभिनेता तर ‘मिस यू मिस्टर’ मधील भूमिकेसाठी मृण्मयी देशपांडे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.
वरळी येथील डोम, एन.एस.सी.आय येथे गुरुवारी रात्री राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रंगला. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, किरण शांताराम, जब्बार पटेल, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आदींसह चित्र नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.
याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा ‘राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार’, ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार’ही यावेळी प्रदान करण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.
‘Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण”