Priority for the transformation of health temples like district hospitals, medical college
जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन
मुंबई : राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये यांचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊन आरोग्य सेवेची ही मंदिरे अधिक सुसज्ज केली जातील.असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या सुसज्ज ५०० खाटांच्या रुग्णालयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.ते म्हणाले सर्व सामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी म्हणाले .
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आमचे शासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन असून धाराशिव येथे उभारण्यात येत असलेले ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय हे त्याचेच एक उदाहरण आहे. शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखाहून पाच लाखापर्यंत उपचाराच्या खर्चास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा विनासायास उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गेल्या दीड वर्षात सुमारे २०० कोटीपर्यंत मदत दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून जवळपास ३०० ठिकाणी हे दवाखाने सुरू झाले आहेत.आता कॅशलेस वैद्यकीय सेवा ही सुरू करत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, सांगली सातारा जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी सारखा उपक्रम राबविला जात आहे. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. धाराशिव येथे उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचा औसा, उमरगा,बार्शी व परंडा या भागातील जनतेस लाभ होणार असून या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग नेहमीच दक्ष आहे. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्यात होत असलेल्या या जिल्हा रुग्णालयामुळे या भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रवीण परदेशी यावेळी म्हणाले, पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपूजनाची भेट मिळाली आहे.३ वर्षात या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.असे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले,राज्यात १० जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालये बांधण्यात येत आहे.३६२ कोटी रुपयांचा निधी डॉ. परदेशी यांनी एशियन विकास बँकेकडून या रुग्णालयाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिला असल्याचे मनोगतातून सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्य”