One-day workshop of Divisional Disaster Management Forum in Pune by Mahapiconet
महापिकोनेटतर्फे पुण्यात विभागीय आपत्ती व्यवस्थापन मंचाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
पुणे : राईज इन्फिनिटी फाऊंडेशन -महापिकोनेट, युनिसेफ महाराष्ट्र आणि सृष्टी कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने युवा विकास आणि उपक्रम केंद्र पुणे येथे आपत्ती जोखीम कमी करण्याच्यादृष्टीने एकदिवसीय विभागीय आपत्ती व्यवस्थापन मंचाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक प्रा. विनोद मेनन यांनी केले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, युवा विकास आणि उपक्रम केंद्राचे संचालक मॅथ्यू, प्रवीण पवार यांच्यासह पुणे, सोलापूर, नागपूर, बीड आणि मुंबई जिल्ह्यातील १५ संस्थांमधील २३ स्वयंसेवक उपस्थित होते.
या कार्यशाळेत आपत्ती पूर्वतयारीसाठी आवश्यक बाबतीत धोरणात्मक बदलांकरता नाविन्यपूर्ण विचार करणे, शाश्वत विकास ध्येयांना अनुसरून कामांची आखणी करणे, गाव आणि वस्ती पातळीवर क्षमता बांधणी करणे, आपत्तीपूर्व, दरम्यान आणि नंतर या तिन्ही टप्प्यांवर वंचितातील वंचित घटकांची समावेशकता असण्याचा दृष्टिकोन बाळगणे, आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य आणि समुपदेशन यंत्रणा मजबूत ठेवणे या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात श्री. पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर सखोल माहिती दिली. एसपीपीआर स्टँडर्ड्स आणि केस स्टडिज मधून सर्व सहभागींनी चर्चा केली. शेवटच्या सत्रात आरआयएफ प्रणित केओआरयु टूलकिटद्वारा स्थानिक पातळीवर आपत्ती पूर्वतयारी करिता संशोधन कामगिरी प्रगती अहवाल वापरून आपापल्या जिल्ह्यामध्ये असणारी गरज लक्षात घेऊन समूह चर्चेत सहभागी झालेल्या पाचही जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी कृती आराखडे बनवले.
आराखड्यासाठी आवश्यक संशोधन, नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी उपक्रम व टप्पे निहाय केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुनरावलोकन व आधीच्या तिन्ही टप्प्यावरचे मूल्यमापन बाबत सादरीकरण करण्यात आले.
‘महापिकोनेट’ हे युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि राईज इन्फिनिटी फाऊंडेशन या नोडल पार्टनरच्या माध्यमातून चालवले जाणारे १६० विविध विकास भागीदार, संस्था व तज्ञ यांचे महाराष्ट्रात स्थापन झालेले नेटवर्क असून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात जोखीम कमी करण्यासाठी शासन व संस्थांमधील दुवा म्हणून काम करते.
आपत्ती जोखिम कमी करणे, शासन व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयातून आपत्ती पूर्वतयारीसाठी जिल्हानिहाय स्वयंसेवी संस्थांचा समन्वय सुरू करण्याच्या प्रक्रियेला चालना देणे आणि त्यावर आधारित स्थानिक पातळीवरचे प्रकल्प तयार करणे या उद्देशाने या मंचाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “महापिकोनेटतर्फे पुण्यात विभागीय आपत्ती व्यवस्थापन मंचाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन”