Senior classical singer Dr. Prabha Atre passed away
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांचं निधन
डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या – राज्यपाल रमेश बैस
पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डॉ प्रभा अत्रे यांना आज श्रद्धांजली वाहिली.
प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. प्रभाताईंचा शिष्य परिवार मोठा आहे. त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले अनेक कलाकार आज शास्त्रीय संगीतात योगदान देत आहेत.
डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या – राज्यपाल रमेश बैस
विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला व भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते विद्यादान केले. डॉ. अत्रे यांच्या रचना अजरामर आहेत. त्यांचे जीवन ही अखंड तपस्या होती. त्यांच्या महान कार्याला वंदन करतो व त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचं गाणं स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारं होतं तसचं ते आपल्या संगीत क्षेत्राचं देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारं होतं. त्यांनी भारतीय संगीताचं हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवलं. आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की, केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन देखील केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरविले आहे.
गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात त्यांना अटल संस्कृती पुरस्कार प्रदान सोहळ्यातील त्यांची शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत –उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी –उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनानं भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.
पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत, कला क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत गायकीवरही अत्रे यांचे प्रभुत्व होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावान आणि श्रेष्ठ कलावंताला मुकला आहे, अशा भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
त्यांचे गायन कला क्षेत्राला प्रेरणा देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ‘किराणा ‘ घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभाताई यांनी बालपणापासून संगीताची आराधना केली. विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन करणाऱ्या अत्रे यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचविणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com