नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Drama has the power to change society – Revenue Minister Balasaheb Thorat

नाटकांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : “समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद नाटकांमध्ये असून महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीला नाटकांमधून विचारांचे बळ मिळाले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. महाराष्ट्रNatya-Spardha-Balasaheb-Thorat-Amit-Deshmukh शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे’ राज्यस्तरीय उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर कठीण परिस्थिती ओढावली होती, सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते; या सर्व पार्श्वभूमीवर राज्य नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करुन आनंद महोत्सव साजरा करीत आहोत.

नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळाले असून यापुढेही हा ओघ कायम राहील असे  बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

रंगकर्मींसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यावर भर देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले, गेली सहा दशके राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. इतका काळ अविरतपणे सुरू असलेली आणि नाट्यकलावंतांना ऊर्जा देणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा आहे. कोविडच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली मात्र आता कोरोना साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी अंतरनियमनासारखी काही पथ्ये आपल्याला पाळायची आहेत. याचे भान ठेवूनच ही हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. निर्बंधाखाली का होईना, ही स्पर्धा यंदा होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.

या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवंत कलाकारांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले आहे. कलाकारांमध्ये व्यावसायिकता यावी, यादृष्टीने अशा कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आहे. राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाट्य-कला क्षेत्रासाठी अनेक पातळ्यांवर कार्यरत आहे. येत्या काळात सिनेमा-नाटक-मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास नाट्यकलावंताना शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ वाढेल, अशी आशा आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा येता काही काळ नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.

जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ९५० संघ/संस्था भाग घेणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *