The liquor shops will be closed for three days on the occasion of Ganeshotsav
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद
पुणे : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील.
तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम – १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म-ई, फॉर्म-ई-२ व ट. ड.-१ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ सप्टेंबर व २८ सप्टेंबर दोन्ही पूर्ण दिवस पूर्ण पुणे जिल्हा, २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती तसेच गणेशोत्सवाचा पाचवा व सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या व सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते अशा भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.
याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद”