The meeting of election coordinating officers concluded
निवडणूक विषयक समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
मतदार नोंदणी आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी कामासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. पात्र व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्यावा, निवडणूक प्रक्रिया उत्तमरीतीने पार पाडण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी दिले.
बैठकीला मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि विविध विषयांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे वेळेवर होतील याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेली कालमर्यादा पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि क्षमतेने काम करावे. दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधेचे नियोजन करावे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी श्रीमती कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीत मतमोजणी स्थळ, वाहतूक आणि संवाद आराखडा, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, निवडणूक विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण, निवडणुकीसाठी मनुष्यबळ, निवडणूक खर्चाबाबत दर निश्चिती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदीविषयक आढावा घेण्यात आला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “निवडणूक विषयक समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न”