Eleven out of 15 members voted in favour of the UN Security Council resolution on Ukraine.
युक्रेन प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर १५ पैकी ११ सदस्यांचे युक्रेनच्या बाजुनं मतदान
युक्रेनमधल्या संकटावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर झालेल्या मतदानात एकूण १५ सदस्यांपैकी ११ सदस्यांनी युक्रेनच्या बाजूने मतदान केलं तर रशियानं विरोधात मतदान केलं आहे.
भारत, संयुक्त अरब अमिरात आणि चीननं तटस्थ भूमिका घेऊन मतदानात भाग घेतला नाही. रशियानं आपला नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव संमत होऊ दिला नाही.
भारतानं या संदर्भात आपली स्थिर, सातत्यपूर्ण आणि संतुलित भूमिका कायम ठेवली आहे. या प्रश्नावर राजनैतिक पद्धतीनं तोडगा काढावा, प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर राखला जावा, असं भारतानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. युक्रेनमधले हल्ले आणि हिंसक कारवाया तात्काळ थांबवण्याचं आवाहन भारतानं केलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून हीच अपेक्षा व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं पालन करायला हवं, कोणत्याही वादाचं निराकरण संवादाच्या माध्यमातून करणं हा एकमेव मार्ग असल्याचं भारताचं म्हणणं आहे.
युक्रेन मधल्या परिस्थितीमुळे भारताला अत्यंत चिंता वाटत असल्याचं भारतानं सांगितलं असून तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करायला भारताचं प्राधान्य आहे.