Emphasize imparting knowledge to the students as well as developing their skills -Deputy Chief Minister Ajit Pawar
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या -उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा परिषदेच्यावतीने गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरण
पुणे : विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
श्री. पवार म्हणाले, नव्या युगाच्या आवाहनांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे.
कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा.
जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले बदल केले आहेत, राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेला पायाभूत सुविधा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे. दुर्गम, डोंगरी भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू.
महिलांना सन्मान मिळाला पाहीजे, यासाठी राज्य शासनाने चौथे महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.