The contribution of ‘Anjuman’ to the social and economic empowerment of the Muslim community is great
मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक सबलीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस
पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल डॉ.जहीर काझी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
डॉ. काझींमुळे ‘अंजुमन‘ला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख
मुंबई : अंजुमन – ई – इस्लाम ही राष्ट्रप्रेमी शिक्षण संस्था असून आपल्या दीडशे वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने देशाच्या आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या आर्थिक – सामाजिक सबलीकरणात मोठे योगदान दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाधिक महिलांना शिक्षण संस्थांच्या नेतृत्वाची संधी दिली तसेच संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पद्मश्री सन्मान हा अंजुमनच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
अंजुमन-ई-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा साबू सिद्दीक पॉलिटेक्निक संस्थेच्या प्रांगणात नुकताच सोमवारी (१९ फेब्रुवारी) जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
सत्कार सोहळ्याला ‘अंजुमन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष डॉ. शेख अब्दुल्ला, कोषाध्यक्ष मोईज मियाजीवाला, अबू आझमी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सैयद, डॉ. झहीर काझी यांचे कुटुंबीय व इतर निमंत्रित उपस्थित होते.
डॉ. काझी यांना पद्मश्री देऊन शासनाने केवळ अंजुमन संस्थेचाच नव्हे, तर मुंबई आणि महाराष्ट्राचा गौरव केला असे सांगून अंजुमन संस्थेने स्थापनेपासून कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण तसेच महिलांच्या शिक्षणाला महत्त्व दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.
देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींना तसेच युवा वर्गाला शिक्षित तसेच कौशल्य प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे सांगून ‘अंजुमन’ने युवकांना कौशल्यासोबतच उद्यमशील होण्यास प्रोत्साहित करावे, असे राज्यपालांनी सांगितले. कृत्रिम प्रज्ञेच्या आजच्या युगात संस्थांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम प्रज्ञेचे लाभ आणि तोटे याबद्दल शिकवले पाहिजे असे सांगून अंजुमनने या कार्यात पुढाकार घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी शिक्षणाला मूल्य शिक्षण व संस्कारांची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याला जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा ‘अंजुमन’च्या १.१० लाख विद्यार्थ्यांचा तसेच ३५०० शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आहे असे सांगून ‘अंजुमन’ने चित्रपट, क्रीडा, विज्ञान यांसह अनेक क्षेत्रात देशाला नामवंत विद्यार्थी दिले असे डॉ. काझी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
अभिनेते दिलीप कुमार, कादर खान, क्रिकेटपटू गुलाम परकार, सलीम दुराणी, यशस्वी जयस्वाल, सरफराज हे अंजुमनचे विद्यार्थी असल्याचे सांगताना अंजुमनचे ५० टक्के विद्यार्थी फी देऊ शकत नाहीत तर ६० टक्के विद्यार्थी प्रथम पिढीतील शिक्षण घेणारे असल्याचे डॉ.काजी यांनी सांगितले. अंजुमन ने एमआयटी बोस्टन व वेस्टमिन्स्टर विद्यापीठ लंडन यांचेशी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. काझी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचा, सामाजिक सेवा कार्याचा तसेच ‘अंजुमन’च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा
One Comment on “मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक सबलीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे”