शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊ

Minister Uday Samant, Hadapsar Latest News, Hadapsar News, हडपसर मराठी बातम्या

Priority to providing basic facilities to entrepreneurs in the Sivaganga Valley

शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊ

-उद्योगमंत्री उदय सामंत

‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’ च्या माध्यमातून नवउद्योजकांना चालना मिळणार

पुणे : शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांना वीज, रस्ता, पाणी आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध करुन दिल्यास याठिकाणी एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील अशीही ग्वाही त्यांनी दिली.

Minister Uday Samant, Hadapsar Latest News, Hadapsar News, हडपसर मराठी बातम्या
File Photo

खेड शिवापूर येथे आयोजित शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या उद्योग परिषदेत उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, अर्चना पठारे, भोरचे तहसिलदार सचिन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, उद्योजक, व्यावसायिक आदी उपस्थित होते.

बैठकीत श्री. सामंत यांनी स्थानिक उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, शिवगंगा खोऱ्यात लहान मोठे ३५० उद्योग असून ते खूप मोठ्या ताकदीने काम करत आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून २५ हजार लोकांना काम मिळाले आहे, याचे समाधान वाटते. या ठिकाणचे उद्योग हे खासगी क्षेत्रात मोडतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे नियम येथे लागू होत नाहीत. जागा उपलब्ध करुन दिल्यास याठिकाणी एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

शिवगंगा परिसरातील उद्योजकांना वीज पुरवठा खंडित होणे, दळणवळणासाठी रस्ता या समस्यासोबतच माथाडी संघटनेच्या नावाखाली काही गुंड प्रवृत्तीचे लोक उद्योजकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यावर कार्यवाही करावी, असे निर्देश देवून येत्या १५ दिवसात या विषयावर व्यापक बैठक घेऊन येथील उद्योजकांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाहीही श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या दहा महिन्यात राज्यात खूप मोठी गुंतवणूक झाली आहे. उद्योग वाढीला चालना मिळण्यासाठी साडे बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग वाढीला पोषक असे वातावरण राज्यात तयार झाले असून १ लाख ६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात उभारले जात आहेत. राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत उद्योजकांना अर्थसहाय्य देण्यात येते. याअंतर्गत या वर्षी राज्यात १३ हजार प्रकरणे मार्गी लागली. पुणे जिल्ह्यासाठी ५ हजार ६०० इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. बँकांनी उद्योजकांच्या कर्ज प्रकरणात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’ च्या माध्यमातून नवउद्योजकांना चालना मिळणार असून शासनाची परवानगी व इतर अनुषंगिक कामे लवकर मार्गी लागण्यास मदत होईल असे सांगून उद्योग वाढीसाठी आणि उद्योगांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचेही श्री. सामंत म्हणाले

आमदार श्री. तापकीर म्हणाले, हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून पीएमआरडीएने या ठिकाणी निवासी आणि औद्योगिक क्षेत्र घोषित करुन उद्योग वाढीसाठी चालना देणे आवश्यक आहे. येथे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जमीन खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर होते. हॉटेल व्यवसायही खूप मोठ्या प्रमाणात चालतो. शेतकऱ्यांच्या तक्रारींवरही पीएमआरडीए आणि स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करत त्या दूर कराव्यात. वाहतूकीचा प्रश्न तसेच स्थानिक नागरिकांचे प्रश्न चर्चा करुन सोडविता येतील, असेही ते म्हणाले.

यावेळी या परिसरातील उद्योजक भानुदास भोसले यांनी चांद्रयान -३ मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
Spread the love

One Comment on “शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *