Exhibition of Jail-produced products on the occasion of Makar Sankranti
मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : मकर संक्रांत सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी वस्तू उपलब्ध असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
मकर संक्रांतीनिमित्त आयोजित विक्री मेळावा व प्रदर्शनामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट, तीळाच्या वड्या, हलव्याचे दागिने, पतंग तसेच इतर सर्व दैनंदीन वापराच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कार्यक्रमाला कारागृह उपअधीक्षक, बी. एन. होले, पल्लवी कदम, मंगेश जगताप, वरीष्ठ तुरुंगाधिकारी आनंदा कांदे, कारखाना व्यवस्थापक एस. एम. पाडुळे, कारखाना तुरुंगाधिकारी सी. आर. सांगळे आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन”