Naveli Deshmukh will participate in tourism activities as the tourism goodwill ambassador
पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार – पर्यटनमंत्री गिरीश महाजन
राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी सहभागी होणार
मुंबई : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख या राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी सहभागी होतील, पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टिवल २०२४ मध्येही सहभागी होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा – वेरूळ सारखी इ.स. सन पूर्व दुसऱ्या शतकातील लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत. राज्यात देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विचार घेऊन महाराष्ट्र शासन राज्यात समृद्ध आणि जबाबदार पर्यटन योजना राबवत आहे.
देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याची ‘ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम’ म्हणून मिस इंडिया ठरलेली नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. नवेली या यूथ आयकॉन म्हणून विविध शासकीय विभागात योगदान देतील. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध पर्यटन महोत्सव,रोड शो विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टिवल २०२४ मध्येही प्रचार व प्रसिध्दीसाठी सहकार्य करत आहेत.
पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आपल्या निवडीबाबत म्हणाल्या की, राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतील. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिध्दी करणार आहे. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टिवल २०२४ मध्येही मी सहभागी असून नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com