Forts in Pune open for tourism.
पुण्यातील गड किल्ले पर्यटनासाठी खुले.
पुणे : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं सुमारे २१ दिवसांच्या बंदीनंतर आता पुणे परिसरातील सर्व गड किल्ले पर्यटनासाठी पुन्हा खुले झाले आहेत. त्यामुळे नियमित पर्यटकांबरोबरच प्रामुख्यानं गिर्यारोहकांची गर्दी वाढू लागली आहे.
गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांसाठी हे गड किल्ले प्रसिद्ध आहेत. मात्र पर्यटनाबरोबरच गिर्यारोहकांनाही या बंदीचा सामना करावा लागला होता. आता ही पर्यटन स्थळे पुन्हा खुली झाल्यानंतर स्थानिक गिर्यारोहक संघटनांकडून नव्यानं मोहिमा आखल्या जाऊ लागल्या आहेत.
कोरोनाचा धोका अद्यापपर्यंत पूर्णपणे संपला नसल्यानं मर्यादित संख्येनं या मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना सहभागी करून घेतलं जात आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर तालुक्यातील काही ठिकाणी रात्रीचे ट्रेकही सुरु झाले आहेत. शहरालगत असलेल्या सिंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून लोहगड, तोरणा, राजगड, तुंग आणि तिकोना किल्ल्यावरही पर्यटक मोठ्या संख्येनं भटकंतीसाठी येऊ लागले आहेत.