Free training for civil judges and first-class judicial magistrates through Sarathi
सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण
पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण आयोजित करत आहे.
सारथीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (MPSC CID & JMFC) पदांची निवड केली जाते. काही दंडाधिकाऱ्यांना नंतर उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळते.
या समाजातील विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सारथी संस्था ११ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु. १०,००० मासिक वेतन तसेच एकवेळचा रु. १२,००० आकस्मिक खर्च दिला जाईल. या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्था देईल. ११४ विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
प्रशिक्षण पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, नाशिक येथील स्पेक्ट्रम अकेडमी आणि छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प एज्युकेशन या संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
सारथी संस्थेचे संचालक श्री. अजित निबाळकर, भा.प्र.से. (से.नि.) यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून, प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
श्री. काकडे यांनी विद्यार्थ्यांना या निशुल्क प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा