Food and Drug Administration Department instructions to follow rules regarding prasad to Ganesh Mandals
गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश
पुणे : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमण २०११ अंतर्गत गणेश मंडळानी काळजी घ्यावी. आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भक्तांना सेवनास देण्यात यावा. दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थांपासून तयार केलेला असल्यास ताजा प्रसाद भक्तांना मिळेल व सदर प्रसाद उरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत.
भाविकासाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. जेणेकरून प्रसादाला धूळ, माती, माशा, मुंग्या या व इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत.
प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजी पूर्वक अंमलबजावणी करावी. नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिंगणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रन घालावा तसेच केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा.
प्रसाद तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासून व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच मांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत. कच्च्या अन्न पदार्थांचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी अवश्य ठेवावी.
प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये शुल्क भरून अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावीत, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) सु. ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश”