स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह कुटुंबव्यवस्थेतूनच मोडीत काढा

Get rid of prejudices against women in the family

स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह कुटुंबव्यवस्थेतूनच मोडीत काढा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसंवादातील सूर

पुणे : अनेक घटनांतून, प्रसंगातून असे दिसून येते की महिलांविषयीच्या पूर्वग्रहाची सुरुवात ही त्यांच्या कुटुंबव्यवस्थेतूनच होते. त्यामुळेच या महिलादिनाच्या निमित्ताने कुटुंबव्यवस्थेपासून समाजापर्यंत

Savitribai Phule Pune Universiy
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

पोहचणारे हे पूर्वग्रह कुटुंबातच मोडीत काढायला हवेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त यंदाच्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार ‘पूर्वग्रह तोडतांना..’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादाचे उद्घाटक व अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.

यावेळी नगरसेविका, प्राध्यापिका तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव जोत्स्ना एकबोटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव सांगितले महिलांनी सक्षम बनुन समाज रचना बदल बदलली पाहिजे असेही जोत्स्ना एकबोटे यांनी सांगितले.

या परिसंवादात व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रताई पवार, आयबीएस च्या संचालक प्रा. ज्योती टिळक, प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. अंजली क्षीरसागर, आयक्यूएससी च्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर आदींनी आपले मत व्यक्त केले.

सुनेत्राताई पवार म्हणाल्या, ग्रामीण भागात काम करत असताना जाणवलं की अनेक घरातील काही मंडळी ही शौचास जाणाऱ्या घरच्या महिलांवरही संशय घेतात. यातून शौचालयाची गरज तर दिसून येते पण महिलांविषयीचा चुकीचा पूर्वग्रहही दिसतो, हे बदलायला हवे. तर ज्योती टिळक म्हणाल्या, पुरुष कमावत नाही किंवा किती कमावतो यावर अवलंबून न राहता स्त्रियांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकायला हवे. बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, हल्ली स्त्रिया सुपर वुमन म्हणून स्वतःला सिद्ध करताना अनेक कामे अंगावर ओढवून घेत स्वतःकडे दुर्लक्ष करतात, जे वेळीच थांबायला हवं.
सुप्रिया पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी स्वतः घेतलेल्या निर्णयावर कितीही सामाजिक दबाव आला तरी ठाम राहायला हवे. तर अंजली क्षीरसागर यांनी सांगितले की आजही समाजात एका ठराविक पातळीपर्यंत मुलींना शिकवलं जातं आणि त्यापुढे शिकायचं असल्यास घर सांभाळून शिक अशी अट ठेवली जाते.

समाजबरोबरच पूर्वग्रह मोडण्याची ही सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पातळीवर करायला हवी असे मत परिसंवादाचे समन्वयक डॉ. विश्राम ढोले यांनी सांगितले.

डॉ. करमळकर म्हणाले, स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हे सावित्रीबाई, ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे यांसारख्या मंडळींनी केले आहे आणि हाच वारसा आम्ही विद्यापीठ म्हणून पुढे नेत आहोत.

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रतीक दामा आणि विक्रमादित्य राठोड यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन’ च्या यू ट्यूब चॅनेलवर करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *