Famous ghazal singer Pankaj Udhas passed away
ख्यातनाम गझल गायक पंकज उधास यांचं निधन
मुंबई : आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं काल ब्रीच कँडी रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते ७३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला.त्यांच्या गाण्यांच्या मैफिली आणि अल्बम्समुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. आजही त्यांनी गायलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. त्या गाण्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं होतं.
संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना वर्ष २००६ मध्ये पद्मश्री या देशातल्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गायन कारकिर्दीला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंकज उधास यांना ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२०’ या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. चिठ्ठी आई है, और आहिस्ता कीजिए बातें, ना कजरे की धार, चांदी जैसा रंग है तेरा, आज फिर तुम पर प्यार आया है या त्यांच्या लोकप्रिय गाण्यांतून रसिकांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम जागृत राहतील.
ख्यातनाम गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
त्यांच्या निधनानं चित्रपट आणि संगीत क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.पंकज उधास यांनी गायलेल्या गझल श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून जायच्या. पंकज उधास यांचे सुर ऐकत ऐकत अनेक पिढ्या घडल्या. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना समाज माध्यमावर व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या चार दशकांपासून संगीत विश्वाला पंकज उधास यांनी आपल्या आवाजानं समृद्ध केलं. त्यांनी गायलेल्या अनेक गझल श्रोत्यांच्या मनात आजही कायम आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“पंकज उधास यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या गायनाने अनेक भावना व्यक्त केल्या, त्यांच्या गझल श्रोत्यांच्या हृदयाला भिडल्या. भारतीय संगीताचे ते दीपस्तंभ होते, त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना प्रभावित केले. गेल्या अनेक वर्षांत त्यांच्याशी झालेला माझा संवाद आठवतो.
त्यांच्या निधनाने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पंकज उधास यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती सह वेदना. ओम शांती.”
मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली
रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंकज उधास यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…’ या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “ख्यातनाम गझल गायक पंकज उधास यांचं निधन”