Governor Bhagat Singh Koshyari’s resignation accepted
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा मंजूर
रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी नियुक्ती; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे नवे राज्यपाल
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्ण माथुर यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.
या राजीनाम्यांनंतर कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. तर लडाखचे नवे नायब राज्यपाल म्हणून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.
यासोबतच आणखी ११ राज्यांचे राज्यपाल तसंच नायब राज्यपालांच्याही बदल्या केल्या गेल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रपती सचिवालायानं आज अधिकृत निवेदन जारी केलं. या निवेदनानुसार निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर हे आता आंध्र प्रदेशाचे नवे राज्यपाल म्हणून काम पाहतील. तर छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उइके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी बदली केली गेली आहे. उईके यांच्या जागी बिस्व भूषण हिराचंदन यांच्याकडे छत्तीसगडचे नवे राज्यपाल म्हणून जबाबदारी दिली आहे.
याशिवाय सिक्कीमचे नवे राज्यपाल म्हणून लक्ष्मणप्रसाद आचार्य यांची, हिमाचल प्रदेशाचे नवे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती झाली आहे.
मणिपूरचे राज्यपाल एल. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून, तर हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वजण आपापल्या कार्यालयांचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखेपासून या नियुक्त्या लागू असतील असंही या निवेदनात म्हटलं आहे.
राजस्थानमधील विरोधी पक्षनेते श्री गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राज्याचे ३१ वे राज्यपाल असतील. वृत्तानुसार, राजस्थानचे भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री कटारिया हे 2014 ते 2018 पर्यंत राजस्थान सरकारचे गृहमंत्री होते. ते मूळचे उदयपूरचे आहेत आणि त्यांनी 9व्या लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2019 पासून राज्यपालपदी नियुक्ती होईपर्यंत ते राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते.
आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की, त्यांच्या अफाट अनुभवाचा राज्याला नक्कीच फायदा होईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com