Inauguration of District Level Mission of Govt ‘Divyangan Dari’ by Bachchu Kadu
शासन दिव्यांगांच्या दारी या जिल्हास्तरीय अभियानाचे, बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन
शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिव्यांगाची सेवा ईश्वर सेवा म्हणून करावी
मागील वर्षी 16 हजार 800 अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने दिव्यांगाना घरपोच
सोलापूर : जागतिक स्तरावर तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. राज्य शासनाने मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला. या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगाना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राज्य शासनाने राबवावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली असून ती लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी केले.
येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. बच्चू कडू मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारगुडे यांच्यासह दत्ता चौगुले, नितीन माने, आभूताई भोजने, झविर शेख आदी उपस्थित होते.
दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष श्री कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना झाल्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून दिला जात आहे. तसेच या अभियानात दिव्यांग नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेऊन त्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश दिले जात आहेत. या माध्यमातून हजारो लाखो दिव्यांगांना शासनाच्या योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळत आहेत. एक ही पात्र दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे यासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून लढा दिला जात होता, त्याला यश येऊन 3 डिसेंबर 2022 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले आहे. तेव्हापासून हा विभाग दिव्यांगांच्या कल्याणासाठी कृतीशील पणे काम करत असून प्रशासनाकडून ही तेवढेच सहकार्य मिळत आहे. आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांगाची अत्यंत चांगली सोय केलेली आहे व मागील वर्षभरात प्रशासन दिव्यांगांसाठी उत्कृष्टपणे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगाप्रती अशीच संवेदना ठेवून सकारात्मक काम करावे व सोलापूर जिल्हा दिव्यांगाच्या योजना राबवण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.
पुरवठा विभागाकडे पाच ते सहा टक्के अन्नधान्य शिल्लक राहत असून जिल्हाधिकारी यांनी त्याचा आढावा घेऊन शिल्लक राहिलेले स्वस्त धान्य दिव्यांगाना वाटप करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्यातील अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शक्ती केंद्र निर्माण करावीत व 100% अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करावीत. दिव्यांगाचे बचत गट स्थापन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. दिव्यांगाने ही शासनाच्या पाच टक्के निधीवर अवलंबून न राहता शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी शासन व प्रशासन मदत करेल, अशी माहिती श्री. कडू यांनी दिली.
शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिव्यांगाची सेवा ईश्वर सेवा म्हणून करावी. दिव्यांगाच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून सोलापूर शहर व पंढरपूर शहरातील कोणताही दिव्यांग बांधव उपाशी राहत असेल तर त्याची माहिती द्यावी त्या बांधवाला घरपोच दोन वेळ जेवण लोकमंगल च्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना शिक्षण प्रशिक्षण देऊन तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मागील वर्षी 16 हजार 800 अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने दिव्यांगाना घरपोच देण्यात आलेली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन आज या ठिकाणी दिव्यांगाशी संबंधित 28 विभागाचे शासकीय योजनांवर आधारित माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्या स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने ही प्रत्येक गावात प्रत्येक दिव्यांग कुटुंबापर्यंत पोहोचून त्या कुटुंबातील प्रत्येक दिव्यांगला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
प्रारंभी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश कडू यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची एकत्रित माहिती वर आधारित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन श्री कडू व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षिका छाया उंब्रजकर आठवणीची साठवण या पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. त्यानंतर श्री कडू यांच्या हस्ते अंध क्रिकेटपटू गंगा कदम हीस 50 हजाराचा धनादेश महापालिकेच्या वतीने देण्यात आला. अस्थिव्यंग क्रिकेटपटू मनोज धोत्रे, कळसुबाई शिखर पार केलेले दिव्यांग सोमनाथ घुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अस्थिव्यंग अबूताई भगत, वेल्डर दस्तगीर शेख, चित्रकार लक्ष्मी शिंदे, गायक शिवशरण गडतुटे, समाजसेवक प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सुमारे दहा हजार दिव्यांग बांधव उपस्थित होते. श्री. कडू यांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व त्या तक्रारी संबंधित कार्याप्रमुखांनी तात्काळ सोडवण्याबाबत निर्देश दिले. दिव्यांगासाठी योजना राबवत असलेल्या 28 विभागांचे शासकीय योजनांचे माहितीपर स्टॉल कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या स्टॉलवर ही दिव्यांग व्यक्तींची गर्दी होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले तर आभार सच्चिदानंद बांगर यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शासन दिव्यांगांच्या दारी या जिल्हास्तरीय अभियानाचे उद्घाटन”