Grandparents are the backbone of a joint family system
आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार
– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पद्धतीमध्ये आजी – आजोबा हे आधारस्तंभ असून त्यांचे नातवंडांवरील प्रेम हे दुधावरच्या सायीसारखे असते. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या राष्ट्राची अनमोल संपत्ती असून आजी – आजोबांना शाळेतील आपल्या नातवांबरोबर काही क्षण घालवता यावेत यासाठी ‘आजी – आजोबा’ दिवस साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज मुंबईतील सेंट कोलंबा या मुलींच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी – आजोबांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्य शुभदा केदारी, माजी नगरसेवक आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी आशा विचारे मामेडी, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह शाळेच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे आजी – आजोबा उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, चांगला समाज घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते. यामुळेच शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर शिक्षक आनंदी राहिले, तर ज्ञानदान अधिक चांगले होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे 61 हजार शिक्षकांना झाला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देताना पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले, आठवीपर्यंत सर्वांना एकसारखा गणवेश, कोडिंग-डिकोडिंगचे प्रशिक्षण, शेती विषयाचा अभ्यासक्रमात समावेश, कौशल्य शिक्षण, परसबाग उपक्रम, रिड महाराष्ट्र अभियान आदींचा त्यांनी उल्लेख केला.
विद्यार्थ्यांच्या आनंदाचा निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) चांगला असेल, तर ते अधिक चांगले ज्ञानार्जन करू शकतील. सेंट कोलंबा ही शाळा सुमारे 190 वर्षे ही दोन्ही कार्ये उत्तमरित्या करीत असल्याबद्दल शाळेचे कौतुक करून मंत्री श्री.केसरकर यांनी शाळेच्या मैदानासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता यावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
उपसंचालक श्री.संगवे यांनी प्रास्ताविकाद्वारे आजी – आजोबा दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे भावविश्व जोपासले जावे यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून हा दिवस राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी – आजोबांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यासोबत खेळ खेळण्यात आले. दीपिका उगरणकर आणि मीना गोखले या आजींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी मल्लखांब, तलवारबाजी, नृत्य आदींचे प्रात्यक्षिक सादर केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार”