जिल्हा ग्रंथोत्सव १० फेब्रुवारीपासून

Book HD Image by https://commons.wikimedia.org/ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Zilla Granthotsav (book festival) from February 10

जिल्हा ग्रंथोत्सव १० फेब्रुवारीपासून ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ग्रंथदिंडीने होणार ग्रंथोत्सवाची सुरुवात

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन

Book HD Image by https://commons.wikimedia.org/ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

पुणे : महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव- २०२३’ चे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी सकाळी १२.३० वा. उद्घाटन होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळमळा चिंचवड येथील श्रीमान महासाधु मोरया गोसावी समाधी मंदिराजवळच्या पटांगणात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के हे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

ग्रंथदिंडीने होणार ग्रंथोत्सवाची सुरुवात

१० फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून ११.३० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ ते ४ वा. ‘प्रगती पुस्तक’ या विषयावर ग्रंथपाल श्रीमती संजीवनी अत्रे यांची मुलाखत, दुपारी ४ ते ५ वा. ‘पर्स हरवलेली बाई’ सादरकर्त्या मंगला गोडबोले यांच्या खुमासदार कथांचे अभिवाचन होणार आहे. सायं. ५ ते ६ दरम्यान सोलापूर येथील फुलचंद नागटिळक हे ‘नटसम्राट’ हे एकपात्री नाटक सादर करणार आहेत.

११ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२.३० वा. ‘छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज- वारसा स्वातंत्र्याचा, लोककल्याणाचा’ या विषयावर कोल्हापूर येथील डॉ. अरूण शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी १२.३० ते २ वा. बालवाचक मेळाव्यात शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी व शिक्षक याचा सहभाग असणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ४ वा. ‘वाचलो म्हणून वाचलो’ या सदरात कवी व लेखक देवा झिंजाड यांची मुलाखत तर दुपारी ४ ते ५.३० वा. राजन लाखे व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रे. श्री. गोखले यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
अहमदनगर येथील बेलवंडी मध्ये उद्योग नगरी प्रस्तावित
Spread the love

One Comment on “जिल्हा ग्रंथोत्सव १० फेब्रुवारीपासून”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *