Greetings from the Prime Minister on the occasion of Marathi Language Day, saying that mother and mother tongue are strengthening the foundation of our survival.
आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांकडून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा
नवी दिल्ली : आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मराठी भाषा गौरवदिनानिमीत्त सर्व मराठी बांधवांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी थोर मराठी साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या कार्याचा गौरवही केला.
जगातल्या प्राचीन भाषांची परंपरा आणि सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा आपल्याकडे असल्याबद्दल प्रत्येकाला गर्व वाटायला हवा असं ते म्हणाले. आपल्या मातृभाषांमध्ये असलेले विज्ञान समजून घेत राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतनं शिकण्यावर जोर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.उद्याच्या राष्ट्रीय विज्ञानदिनानिमीत्त थोर शास्त्रज्ञ सीव्ही रमण यांच्यासह, विज्ञान क्षेत्रात योगदान दिलेल्या शास्त्रज्ञांना आदरांजली वाहली. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, यासाठी दैनंदिन जगण्यातल्या प्रत्येक क्रिया-प्रक्रियेमागचं शास्त्र मुलांना समजून सांगावं, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतीय आयुर्देव परंपरेचं महत्वही विषद केलं. केनियाचे माजी प्रधानमंत्री राईला ओडिंगाजी यांच्या मुलीची गेलेली दृष्टी, केरळ इथं आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर बऱ्याच अंशी परत मिळाल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. केंद्र सरकार आयुर्देवाच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहे. या क्षेत्रातल्या स्टार्ट अप्सना पाठबळ देण्यासाठी सुरु केलेल्या आयुष स्टार्ट अप चॅलेंजमध्ये तरुणांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभरातल्या महिलांच्या प्रगतीचा आणि त्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी घेतला. आपले सण साजरे करतांना ‘व्होकल फॉर लोकल’चा विसर पडू देऊ नये, आणि सण-उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादने खरेदी करावीत असं आवाहन त्यांनी केलं.
देशात स्वच्छताविषयक उप्रकमांमधल्या वाढत्या लोकसभागाची उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये मांडली. यावेळी त्यांनी मुंबईतल्या सोमैय्या महाविद्यालयानं राबवलेल्या उपक्रमाचाही उल्लेख केला.