The government of Maharashtra is committed to strictly follow the directives of the Union Ministry of Health – Rajesh Tope
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध – राजेश टोपे
राज्यात ५६३ रुग्ण कोरोनामुक्त
पुणे : कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं चाचण्या वाढवण्याचे आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज टोपे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांमधे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसत असून, तिथे सतर्कतेचे उपाय काटेकोरपणे राबवले जातील, असं ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर कोविड प्रादुर्भावात अचानक वाढ होत असल्यानं संबंधित भागात सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.
कार्यालयं, बस, रेल्वे आणि बंदिस्त ठिकाणी लोकांनी मास्क घालण्याचं आवाहन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सनं केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खुल्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, याबाबत दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, मात्र रुग्णसंख्या वाढू नये यादृष्टीनं सर्वांनीच नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात ५६३ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल कोविड-१९ च्या १ हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ५ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३ हजार ७३५ रुग्ण मुंबईत आहेत, त्याखालोखाल ठाण्यात ६५८, पुण्यात ४०९, तर रायगड जिल्ह्यात १०८ रुग्ण आहेत.
मुंबईत आज ७६३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ७२६ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ३७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ३५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या ३ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ५७६ दिवसांवर आला आहे.
हडपसर न्युज ब्युरो