Fatal accident on the old Pune Mumbai highway, a bus fell into a valley at Borghat
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात, बोरघाटात बस दरीत कोसळली
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
पुणे : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यातील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला असून तो वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ही बस पुण्याहून मुंबईला निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी क्रेन आणि रुग्णवाहिका मागवून लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तसेच काही ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना वर आणण्याचे कामही तात्काळ सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील प्रवासी असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या प्रति आपण शोक व्यक्त करत असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राज्य सरकार अपघातग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं असून,प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्थसहाय्य घोषित केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या संदर्भात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून माहिती घेतली आहे आणि स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे, असं त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. जखमींवर योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघातग्रस्त आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, जखमींच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत त्यांना दिलासा दिला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com