The ‘discovery’ of research will take place between 12 and 15 January..!
१२ ते १५ जानेवारी दरम्यान रंगणार संशोधनांचा ‘आविष्कार’..!
आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन
स्पर्धेविषयी
- दोन वर्षाच्या खंडानंतर स्पर्धा होणार
- राज्यातील २२ विद्यापीठांचा सहभाग
- दोन हजारांपासून बक्षिसे ते एक वर्षासाठी एक लाख वीस हजारापर्यंतची शिष्यवृत्ती
- मुलांपेक्षा मुलींचा सहभाग अधिक
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण ४८ प्रकल्प स्पर्धेत
- २००६ पासून आतापर्यंत १४ स्पर्धा झाल्या असून त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९ वेळा विजेते तर ४ वेळा उपविजेता
पुणे – कोविडच्या दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा सर्व विद्यापीठामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन यंदा १२ ते १५ जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार असून याचे उद्घाटन राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगासिंह कोश्यारी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यातून १२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २००६-०७ पासून ही आंतरविद्यापिठीय संशोधन संमेलनाचे (आविष्कार स्पर्धा) आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत राज्यातील अनेक विद्यापीठातील विद्यार्थी सहा विद्याशाखांमध्ये आपापले प्रकल्प सादर करतात. मागील दोन वर्ष सर्वत्र कोव्हिड महामारीचे सावट असल्याने ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र आता पुन्हा त्याच उत्साहाने विद्यार्थी स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. याचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्व.प्रा.एम.आर.भिडे आविष्कार नगरी, खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक प्रा.डॉ.मोहन वाणी, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले आणि आविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक १२ ते १४ या दोन दिवसांत प्रकल्पांचे सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन, संगणकीय सादरीकरण विद्यार्थी करतील. अंतिम निकाल दिनांक १५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल अशी माहिती डॉ.संजय ढोले यांनी दिली. या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटीएम चे संचालक प्रा.डॉ.आर.कृष्णन उपस्थित राहणार आहेत.
६४९ संशोधन प्रकल्प होणार सादर
मानव्यविद्या आणि भाषा, विज्ञान, औषध व औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आदी सहा विद्याशाखांमध्ये एकूण ६४९ विद्यार्थी प्रत्येकी एक याप्रमाणे ६४९ संशोधन प्रकल्प सादर करतील.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com