महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया यूथ गेम्स Khelo India Youth Games हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Brilliant performance of Maharashtra players

महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

-खो-खो मध्ये मुलामुलींचा यजमानांवर दणदणीत विजय
– टेबल टेनिसमध्ये चौघे बाद फेरीत
-बॉक्सिंगमध्ये देविका घोरपडेचा विजय
– बास्केटबॉलमध्ये मुलींना अपयशKhelo India

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये भोपाळ, जबलपर, इंदौर अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी पहिल्या दिवशी चमकदार राहिली. खो-खो, बॉक्सिंग, टेबल टेनिस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडू आपले आव्हान राखून कायम आहेत. केवळ बास्केटबॉलमध्ये मुलींना पराभव पत्करावा लागला.

चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेमध्ये सलग दोन विजय साजरे केले आहेत.

जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्र महिला संघाने यजमान मध्य प्रदेशला १ डाव १२ गुणांनी पराभूत केले.

नरेंद्रच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष संघाने यजमान मध्य प्रदेश ला १ डाव व ६ गुणांनी धूळ चारली. या विजयात वैभव, निखिल, गणेश, सचिन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे यजमान मध्य प्रदेश संघांना घरच्या मैदानावर लागोपाठ पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आपली मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघांनी गटात दोन विजय संपादन केले आहेत.

टेबल टेनिस – चौघे बाद फेरीत

महाराष्ट्राच्या जश मोदीने मुलांच्या गटात, तर रिषा मीरचंदानी, पृथा वर्टीकर व तनिषा कोटेचा यांनी मुलींच्या गटातून बाद फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील दुपारच्या सत्रात मोदीने धैर्य तांडेलचा ११-४,११-३,११-८ असा पराभव केला. जश मोदीने त्यापूर्वी सकाळी बंगालच्या अनुभवी सौम्यदीप सरकारवर विजय मिळवून अपेक्षा उंचावल्या होत्या.

मुलींच्या गटात रिषा हिने अनुष्का चौहान हिचा ११-१,११-१,११-१ असा धुव्वा उडविला. पृथा हिने हरियाणाच्या सुहाना सैनी हिला ५-११,३-११,११-८,११-८,११-१ असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. पहिल्या दोन गेम गमावल्यानंतर तिने जिद्दीने खेळ केला आणि सामना जिंकला. तनिशा हिने अरुणाचल प्रदेश संघाच्या अवेमी मिहू हिला ११-३,११-३,११-३ असे निष्प्रभ केले.‌ जेनिफर हिला मात्र साखळी गटातच पराभूत व्हावे लागले. साखळी गटातील दुसऱ्या सामन्यात तिला प्रियोकी चक्रवर्ती हिने ११-८,११-६,८-११,११-७ असे हरविले. जेनिफर हिचा हा दुसरा पराभव होता.

बास्केटबॉल – महाराष्ट्राची अपयशी सुरुवात

बास्केटबॉल क्रीडा प्रकारात महाराष्ट्राची सुरुवात अपयशी राहिली. महाराष्ट्राच्या मुलींना छत्तीसगड संघाकडून ७९-९३ असा पराभव पत्करावा लागला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या छत्तीसगडच्या खेळाडूंचा सामना महाराष्ट्राला करता आला नाही. छत्तीसगडकडून डिम्पल धोबीने सर्वाधिक २६, तर डी. किर्तीने १९ गुणांची नोंद केली. दोघींना कर्णधार रिया कुंगाडकर (१८) आणि विद्या (१४) यांची साथ मिळाली. महाराष्ट्राकडून अनन्या भावसारने सर्वाधिक २७ गुणांची नोंद केली. मात्र, अन्य मुलींच्या खेळात अचूकतेचा अभाव राहिल्याने अनन्याचे प्रयत्न एकाकी ठरले. मुलींचा उद्या तमिळनाडूशी सामना होणार आहे.

देविका घोरपडेची विजयी सलामी

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या देविका घोरपडे हिने मुष्टियुद्ध स्पर्धेत शानदार सलामी दिली. मात्र तिची सहकारी दिशा पाटील हिला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

तात्या टोपे नगर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या ५० ते ५२ किलो गटात देविका हिने मणिपूरच्या एलिना गेबम हिचा ५-० असा पराभव केला. जागतिक युवा अजिंक्यपद विजेती खेळाडू देविका हिने अपेक्षेप्रमाणे या लढतीत रुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. अचूक ठोसे आणि भक्कम बचाव अशी दुहेरी नीती अवलंबत तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधी दिली नाही.

पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर देविका हिने सांगितले,” चांगली सुरुवात झाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. येथे सुवर्णपदक जिंकण्यासाठीच मी उतरले आहे. त्या दृष्टीने मी खूप मेहनत केली आहे.”

महिलांच्या ६० ते ६३ किलो गटात दिशा हिला हरियाणा संघाच्या रवीना कुमारी हिने ५-० या फरकाने हरविले. रवीना हिने उंचीचा फायदा उठवत वर्चस्व राखले. दिशाने जिद्दीने तिला लढत दिली.‌

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *