Both Houses of Parliament adjourned for the day
संसदेची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब
हिंडेनबर्ग संस्थेनं प्रकाशित केलेल्या अहवालावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांचा प्रचंड गदारोळ
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेतली
समाजवादी पक्ष, बसपा, शिवसेना (यूबीटी) आणि इतर पक्षांचे सदस्यही उभे होते
नवी दिल्ली : अदानी उद्योगसमूहाबाबत हिंडेनबर्ग संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभागृहाचं कामकाज सुरु होताच याप्रकरणी चौकशीची मागणी करत हौद्यात धाव घेतली. समाजवादी पक्ष, बसपा, शिवसेना (यूबीटी) आणि इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या पायावर उभे होते.
गोंगाटामध्ये, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंदोलक सदस्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सभागृहाला चर्चा करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सभागृह चर्चेसाठी असून त्यात सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सदस्यांनी आपापल्या जागी परत जावं असं सभापती ओम बिरला यांनी वारंवार सांगूनही हे सदस्य हौद्यातूनच घोषणा देत राहिले. गोंधळामुळे कामकाज चालवणं अशक्य झालं तेव्हा सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेत, दुपारी २ वाजता पहिल्या तहकूबनंतर सभागृह पुन्हा जमले तेव्हा असेच दृश्य पाहायला मिळाले. काँग्रेस, टीएमसी, द्रमुक, आप, समाजवादी पक्ष, डावे आणि इतर विरोधी सदस्यांनी या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केली.
राज्यसभेत अनेक सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळ, आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी पैसा गुंतवलेल्या कंपन्यांचे समभाग बाजारात कोसळत असल्याबद्दल चर्चेची मागणी करणारा हा स्थगन प्रस्ताव होता.
हा प्रस्ताव योग्य पद्धतीने मांडला नसल्याचं कारण देऊन अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तो फेटाळून लावला. तेव्हा काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ सुरु केला. अध्यक्षांनी सदस्यांना शांतता राथायला सांगितलं मात्र घोषणाबाजी चालूच राहिल्याने सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com