Maharashtra Bhushan Award was announced to a senior social worker, and illustrator Appasaheb Dharmadhikari
महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले असून त्यांनी आज रेवदंडा येथे आप्पासाहेबांची भेटही घेतली.
14 मे 1946 रोजी जन्मलेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा निर्मूलन, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.
पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी बद्दल
रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.
या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com