Inauguration of Craftroots Exhibition 2023 by Uttar Pradesh Governor Anandiben Patel
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते क्राफ्टरुट्स प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन
पुणे : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते क्राफ्टरुट्स प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन डच पॅलेस येथे करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला सशक्तीकरणाचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे, असे मत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाला ग्रामश्री ट्रस्ट तसेच क्राफ्टरुटसच्या मुख्य विश्वस्त अनारबेन पटेल, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, एमक्युअर कंपनीच्या संचालक भावना मेहता, पीडीलाईट इंडस्ट्रीजचे वरीष्ठ उपाध्यक्ष पी. के. शुक्ला, उत्तर प्रदेश राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्रीमती पटेल म्हणाल्या, कला ही सर्वांना जोडते. ग्रामीण कारागीर हे शालेय शिक्षणात कमी असले तरी कलेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतात. कलाकुसरीच्या वस्तूंद्वारे आपल्या राज्यातील सांस्कृतिक परंपरा देशभरात पोहोचवतात. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार होण्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. गावांच्या विकासासाठी विद्यापीठे गावांशी जोडली गेली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, हस्तकला ही भारताची परंपरा आहे. भारताच्या परंपरेला आणि ग्रामीण कौशल्यांना जगासमोर आणण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने देशातील ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्राफ्टरुट्सच्या माध्यमातून चांगले काम होत आहे.
यावेळी अनारबेन पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. क्राफ्टरुटशी देशातील विविध राज्यातील सुमारे 25 हजार कारागीर जोडलेले आहेत असे त्या म्हणाल्या.
यावेळी श्रीमती पटेल आणि श्री. केसरकर यांनी स्टॉल ला भेट देऊन करागिरांशी संवाद साधला तसेच श्री. केसरकर यांनी हस्तकलेच्या वस्तूंची खरेदीदेखील केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com