Investment in education sector is important for nation building
शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक देश उभारणीसाठी महत्वाची
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
श्री बालाजी विद्यापीठाचा 22 वा पदवी प्रदान सोहळा संपन्न
पुणे : 21व्या शतकात ज्ञान ही सर्वात मोठी ताकद असून शिक्षणावरील गुंतवणूक हीच देश उभारणीच्या कार्यातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
पुण्याजवळील ताथवडे इथल्या श्री बालाजी विद्यापीठाचा 22 वा पदवी प्रदान कार्यक्रम श्री गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. डेलाइट आशिया पॅसिफिक कंपनीचे वरीष्ठ अधिकारी एस. वी. नाथन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे प्र कुलपती परमानंद सुब्रमण्यम, कुलगुरू वी. सी. शिरोडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्नातक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री गडकरी पुढे म्हणाले की , शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना त्यातील गुणवत्ता मात्र कायम ठेवण्याचे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे.
व्यवस्थापनाचे शिक्षण महत्वाचे आहेच पण त्याबरोबर उद्यमशीलता अधिक महत्वाची असून कोणतीही गोष्ट साकारण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती असण्याची गरज असल्याचे श्री गडकरी म्हणाले .
व्यक्तिगत पातळीवर तुम्ही कितीही हुशार असला तरी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी तुमच्याकडे हवी. ज्ञान , संपत्ती आणि सत्ता यातून गर्व निर्माण होतो म्हणूनच त्याबरोबर लीनता, शालीनता हे गुण सुद्धा अंगीकारले पाहिजेत. संवेदनशीलता, सहृदयता आणि सहकार्याच्या भावनेतून होणारे काम अधिक मोलाचे असते असे त्यांनी स्पष्ट केले .
देशाच्या ग्रामीण भागात सर्वदूर जोपर्यंत अत्याधुनिक तंत्रंज्ञान पोहोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होणार नाही हे स्पष्ट करतानाच जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन मागणीनुसार उद्योग व्यवसाय सुरू झाले तर त्यातून निर्यात वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे प्रकुलपती परमानंद सुब्रमण्यम यांनी स्वागत केले तर कुलगुरू शिरुडे यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाची माहिती दिली. अधिष्ठाता वी जी पिल्लई यांनी आभार प्रदर्शन केले. तत्पूर्वी विद्यापीठाचे संस्थापक कुलपती ए. बाल सुब्रमण्यम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com