In order to increase the percentage of voting, public awareness activities should be implemented
मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने जनजागृतीचे उपक्रम राबवावेत
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
मतदारांना मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन
पुणे : पोट निवडणूक होणाऱ्या २१५- कसबा विधानसभा मतदार संघ आणि २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी जनजागृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस उपायुक्त आर. राजा, संदीप सिंग गिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले, मतदारांना यादीत नाव तपासण्यासाठी https://www.nvsp.in तसेच अन्य पर्यायांची माहिती नागरिकांना द्यावी. यावेळी ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता अशा पात्र मतदारांना ‘नमुना १२ डी’ हा अर्ज मतदारांकडून वेळेत भरून घ्यावा. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात यावे.
मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठीच्या सुविधांची माहिती द्यावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीचे कार्य करावे. सी-व्हीजील ॲपवरील तक्रारींचे कालमर्यादेत निवारण होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. निवडणूकीशी संबंधीत सर्व अहवाल वेळेवर द्यावेत आणि कालमर्यादेत कामे करावीत. नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com