गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार

Pune Zilla Parishad पुणे जिल्हा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The lack of civic facilities in the village will be filled in two years

गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार

–पालकमंत्री

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन

गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करणार

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.Pune Zilla Parishad पुणे जिल्हा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटी रुपयांची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली असून नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.

देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उशिर करू नये, असे त्यांनी सांगितले.

सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केंद्राकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी ८५ टक्के रक्कम थेट मिळते आहे. त्याचा विनियोग करताना गावाच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन विकासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

प्रास्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबवून १ हजार ३५४ गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात येत असून उर्वरीत गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत २९९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे. सरपंचांनी योजनेसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि स्थानिक वाद मिटवून प्रत्येक घरात नळ जोडणी करून द्यावी. योजनेसाठी वेळेवर वीज जोडणी करून घ्यावी आणि १० टक्के लोकवर्गणी जमा करून घ्यावी. कामाची गुणवत्ता चांगली राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे. या सरपंचांना गावाचा विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी जल जीवन मिशनचे कामही चांगल्यारितीने करावे. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे, असेही श्री.प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यात घन कचरा व्यवस्थापनाचे सर्वाधिक काम झाले, गतवर्षी करवसुलीत २५ टक्के वाढ होऊन ३४० कोटीची कर वसुली झाली आहे. जिल्ह्यातील ९ लाख २७ हजार घरापैकी ८९ टक्के घरांवर महिलांचे नाव लागले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी‘घर घर जल’ घोषित गावातील सरपंचांचा, योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, जल जीवन मिशनच्या कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गुणवत्ता, पाणी गुणवत्ता, कामांची तपासणी, गुणनियंत्रण, योजनेच्या उपांगांचे व्यवस्थापन व संनियंत्रण आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *