Training opportunities for football players in Germany
फूटबॉल खेळाडूंना जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी
निवडीसाठी ‘एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप’ स्पर्धेचे आयोजन
राज्यातील १४ वर्षाखालील २० खेळाडूंची निवड ‘एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप’ स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार
पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व बायर्न क्लब जर्मनी यांच्या करारानुसार म्युनिक, जर्मनी येथे फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील १४ वर्षाखालील २० खेळाडूंची निवड ‘एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप’ स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. १३ व १४ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेमुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल व फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी व योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.
जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १३ व १४ फेब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव, ता. हवेली येथे पुणे जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य स्पर्धेतून एकूण २० खेळाडूंची निवड करुन त्यांना म्युनिक, जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. यामध्ये जाण्या- येण्याचा, निवास, प्रशिक्षण आदी खर्च करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २००९ नंतर जन्मलेली १४ वर्षाखालील मुले या स्पर्धेसाठी पात्र असतील. या शालेय क्रीडा सांघिक खेळासाठी प्रवेश अर्ज १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे येथे ऑफलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला व शाळेत शिकत असल्याचे (बोनाफाईड) प्रमाणपत्र जोडावे. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडासाहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वतःसोबत आणाव्यात.
स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुलांचा फुटबॉल संघ तयार ठेवावा. विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तानाजी पाटील ( भ्रमणध्वनी क्र. ९९६००१३५०४) व फारुख शेख (भ्रमणध्वनी क्र. ९०११०१३९८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com