10.61 Crore Fake GST Receipt Scam Exposed
पश्चिम मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने 10.61 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी पावत्या घोटाळा उघडकीस आणला
मुंबई : 76 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या बनावट पावत्यांचा वापर करत केलेला 10 कोटी 61 लाख रुपयांचे बनावट आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडीट जाळे, सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील मुंबई प्रदेश विभागाच्या मुंबई पश्चिम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज उध्वस्त केले आणि जीएसटी घोटाळा प्रकरणी मालाड स्थित कंपनीच्या मालकाला अटक केली.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मे. संघवी ट्रेडर्स या कंपनीविरुद्ध सुरु केलेल्या चौकशी अंती असे दिसून आले की या कंपनीने प्रत्यक्ष वस्तू न स्वीकारता अथवा न पुरवता सीजीएसटी कायदा 2017 मधील तरतुदींचे उल्लंघन करत फसवणुकीने 10 कोटी 61 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आहे किंवा इतरांना हस्तांतरित केले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात 76 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला.
तपासणीदरम्यान, उपरोल्लेखित कंपनीच्या मालकाने नोंदविलेल्या जबाबात, जीएसटी फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्याला 27 जुलै 2022 रोजी सीजीएसटी कायदा 2017 मधील कलम 69 अंतर्गत, कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्याला एस्प्लनेड न्यायालयातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सीजीएसटीच्या मुंबई विभागाचे अधिकारी कर चुकवेगिरी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करत आहे. मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने, फसवणूक करणाऱ्या तसेच चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱ्यांचे जाळे कार्यान्वित करणाऱ्या आणि त्याद्वारे प्रामाणिक करदात्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यायला लावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सीजीएसटीच्या मुंबई पश्चिम आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी 603 कोटी 88 लाख रुपयांच्या कर चुकवेगिरीची प्रकरणे उघडकीस आणली असून त्यापैकी 68 कोटी 21 लाख रुपये वसूल केले तसेच कर चुकविणाऱ्या 7 व्यक्तींना अटक केली. सीजीएसटीचे मुंबई पश्चिम कार्यालय चुकीच्या पद्धतीने आयटीसी मिळविणे आणि दुसऱ्यांकडे हस्तांतरित करण्याच्या व्यवहारात गुंतलेल्या, फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि बनावट कंपन्या यांच्या विरुद्धची मोहीम येत्या काळात अधिक तीव्र करणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com