1000 Khelo India centers to be set up in the country by next year – Anurag Thakur
देशात पुढच्या वर्षीपर्यंत १ हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार – अनुराग ठाकूर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात उभारलेल्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र आहेत. पुढच्यावर्षीपर्यंत ही संख्या १ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण आज केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
आपल्याला भारतीय खेळाडूंना अधिकाधिक पदकं जिंकण्याच्यादृष्टीनं सक्षम बनवायचं आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारं, राष्ट्रीय खेळ प्राधिकरण, राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडाविषयक कॉरपोरेट संस्था या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.
स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचे पूर्णाकृती प्रत्येकी ६ फूट उंचीचे पुतळेही या क्रीडा संकुलाच्या आवारात उभारले आहेत. हे क्रीडा संकुल उभारल्याबद्दल, आणि क्रीडा संकुलाला स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं नाव दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं. १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पुणे विद्यापीठाचेच विद्यार्थी होते .
स्वामी विवेकानंद सर्व युवांचं प्रेरणास्त्रोत आहेत. खेळलात तरच शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुदृढ राहू शकतो असा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचा पुतळा उभारणं ही गौरवाची बाब आहे असं ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत इथल्या विद्यापीठांची स्पर्धा आयोजित करायची असेल, तर तसं करायला केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही, आमचं पूर्ण सहकार्य असेल असे ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या या क्रीडा संकुलाला आपल्या मंत्रालयाचं कोणतंही सहकार्य हवं असेल तर ते दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
भावी खेळाडू घडवण्यासाठी माजी खेळाडूंना वर्षाला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. क्रीडा क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधांवर भर दिल्यापासून भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे, विशेषत: दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले.
खेलो इंडिया सारखी योजना सुरु करून त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूंना प्रगतीची संधी मिळवून आहे असं ते म्हणाले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा, क्रिकेटपटू कपील देव यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी, एका चांगल्या खेळाडूची कामगिरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरते असं त्यांनी सांगितलं.
खेळ आणि त्यासाठीच्या पायाभूत सोयीसुविधांचं महत्व लक्षात घेऊनच केंद्र सरकारने खेलो इंडिया उपक्रमाची अर्थसंकल्पीय तरतूद ५० टक्क्यांनी वाढवून ६५७ कोटी रुपयांवरून ९७४ कोटी रुपये इतकी केली आहे. २०१३-१४ च्या तुलनेतही खेळांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद ३ पटीनं वाढवत १,२१९ कोटी रुपयांवरून ३,०६२ कोटी रुपये इतकी केली आहे. राज्य सरकारंही आपल्या खेळांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारनं क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, राज्यांनीही अशा प्रकारे तरतूद केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठातलं क्रीडा संकुल 27 एकर परिसरात असून यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ॲथलेटीक्स ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रोटर्फ टेनिस कोर्ट, हँडबॉल, खो-खो, कबड्डी, यासह टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, जिमनॅस्टिक, जलतरण तलाव, हॉकी स्टेडियम आदी सुविधा असणार आहेत.
खाशाबा जाधव क्रीडा संकुलाविषयी
हे संकुल विद्यापीठातील २७ एकर परिसरात असून त्यामध्ये सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुटींग रेंज, अद्यावत व्यायामशाळा आहे. याशिवाय खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल अशा मैदानी खेळाच्या क्रीडांगणांचा या संकुलात समावेश आहे.
तसेच बहुउद्देशीय इनडोअर हॉल असून त्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आदी विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.
लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरणतलाव, क्रिकेट व अस्ट्रो टर्फ हॉकी क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे. या अद्यावत क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यास मदत होणार असून यातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील.
हडपसर न्युज ब्युरो