Organizing various programs in the state on the occasion of the 100th Memorial Day of Rajarshi Shahu Maharaj
राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या विधान भवनात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतल्या चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून १०० सेकंद स्तब्ध उभं राहून अभिवादन केलं.
कोल्हापुरात शाहू समाधी स्थळ इथं विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभं राहून शाहू महाराजांना अभिवादन केलं.
सोलापूर जिल्ह्यातही छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं सकाळी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभं राहून वंदन करण्यात आलं. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुंबईतल्या गिरगांवात खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये उभारण्यात आलेल्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभाचं लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.