PM Modi inaugurates 108th Indian Science Congress
अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा
– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नागपुरातल्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर: येत्या २५ वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्यात वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.
संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असलेल्या आणि देशाच्या बदलत्या गरजा पूर्ण करु शकणाऱ्या गोष्टींवर संशोधन करण्याचं आवाहन त्यांनी संशोधकांना केलं. ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले तर देशाला याची मदत होईल, असं ते म्हणाले.
विज्ञानाचा उपयोग हा तेव्हाच होईल जेव्हा ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून जमिनीवर पोहोचेल. त्याचा प्रभाव वैश्विक स्तरापासून तळागाळापर्यंत पोहोचेल आणि संशोधन पत्रिकेतून प्रत्यक्ष वापरात त्याचा विस्तार होईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
संशोधन क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग हा समाज आणि वैज्ञानिक जगताच्या प्रगतीचं प्रतिबिंब आहे. जागतिक नवसंशोधन निर्देशांकात २०१५ पर्यंत भारत ८१ व्या स्थानी होता. २०२२ मध्ये आपण ४० व्या स्थानी पोहोचलो आहोत. विज्ञानाच्या क्षेत्रात पहिल्या १० देशांमध्ये भारत पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. डेटा आणि तंत्रज्ञान भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या गोष्टी देशातल्या विज्ञान क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जातील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे. यंदाच्या सायन्स काँग्रेसची संकल्पना सुद्धा महिला सक्षमीकरण अशी आहे आणि संयोगाने महिला अध्यक्ष या विज्ञान काँग्रेसला लाभल्या आहेत, हा योगायोग राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लक्षात आणून दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विज्ञानाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात तसेच भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यात करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
या विज्ञान काँग्रेस मधून निघालेल्या विचार मंथनातून महिला सशक्तीकरणाचे ध्येय साधले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
याप्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एका टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान अशी यंदाच्या अधिवेशनाची विषय संकल्पना आहे. येत्या ७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तांत्रिक सत्रांची १४ विभागांमध्ये विभागणी केली आहे.
याशिवाय महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषद देखील भरविण्यात येणार आहे.
महाप्रदर्शन ‘प्राईड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘शान भारताची’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान तसंच वैज्ञानिक क्षेत्रातल्या ठळक घडामोडी आणि प्रमुख शोध मांडले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com