13 candidates are in the fray for 10 seats in the Legislative Council
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात
मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं ६, राष्ट्रवादी काँग्रेसनं ३ तर शिवसेना आणि काँग्रेसनं प्रत्येकी २ जणांना उमेदवारी दिली आहे.
काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर राज्यसभेपेक्षा ही निवडणूक अधिक चुरशीची होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सुरुवातीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
याशिवाय, शिवाजीराव गर्जे यांच्या रूपानं एक अतिरिक्त उमेदवारही उतरविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला, तो विश्वास मी सार्थ करेन, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सहावे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. १० जूनला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ जूनपर्यंत आहे. निवडणूक लढवली गेली तर २० जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.
सदाभाऊ खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत असल्यानं तसंच रामनिवास सत्यनारायण सिंग यांचं निधन झाल्यानं या दहा रिक्त जागांसाठी विधानसभा सदस्यांकडून निवड केली जाणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो