2 crores to Rudranksh Patil, who won the gold medal in the world shooting competition
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये
राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन
मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. २००६ चा ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्रा नंतर जागतिक विजेतेपद मिळवणारा रूद्राक्ष हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.
रुद्रांश पाटील याने इजिप्त येथील कैरो शहरात झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत मोठी कामगिरी केली. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.
रूद्राक्ष ने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझो याचा १७-१५ अशा फरकाने पराभव केला. जागतिक नेमबाजी स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या रूद्राक्षने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
त्याबद्द्ल आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
२०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com